हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या अर्थ संकल्पामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ४६१ कोटी रुपयांची मदत दिल्याचे सांगितले. राज्यातील ६६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर साडे चार हजार कोटींची मदत जमा केल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. राज्यातील २६ दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांमधील १७ हजार ९८५ गावांमधील शेतकऱ्यांना ही मदत दिल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. त्या रूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर्सना टँकर सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विजेची बिले न भरल्यामुळे राज्यातील उपसा सिंचन योजनांची वीज कापण्यात आली आहे. थकीत बिलाच्या केवळ पाच टक्के बिल भरून पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्याची मुभा देण्यात आल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात १० जूनपर्यंत ५ हजार २४३ गावे आणि ११ हजार २९३ वस्त्यांना ६ हजार ५९७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवण्यात येत आहे. सध्या सरकारने ९ हजार ९२५ विहिरी आणि बोअर वेल पाणी पुरवठ्यासाठी सरकारने ताब्यात घेतले आहेत. राज्यात सध्या २ हजार ४३८ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. राज्यात १० जून पर्यंत १ हजार ६३५ चारा छावण्यासुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच शेळ्या आणि मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. चाऱ्याचा तुटवडा होऊ नये म्हणून ३० हजार हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याचे उत्पादन केले जात आहे. यामुळे चाऱ्याची टंचाई नियंत्रणात आल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.