महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट : साखर उत्पादन 90 लाख टनापर्यंत घसरण्याची शक्यता

कोल्हापूर: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली असून राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. कोल्हापूर वगळता राज्याच्या ऊस पट्ट्यात परिस्थितीत आणखीनच गंभीर बनली आहे. विशेषतः सोलापूर आणि मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून शेतकरी उसाचा चाऱ्यासाठी वापर करू लागले आहेत. राज्य सरकार ने दुष्काळ निवारणासाठी तत्काळ पावले उचलली नाहीत, तर त्याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम आगामी साखर हंगामावर होण्याचा अंदाज साखर उद्योगाच्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. आगामी हंगामात राज्यातील साखर उत्पादन यंदाच्या 105 लाख टनावरून 90 लाख टनापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर वगळता सर्वत्र भीषण स्थिती…

यंदा कोल्हापुरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. तसेच जिल्ह्यात सिंचन व्यवस्था चांगली असल्याने अद्याप दुष्काळाची झळ जाणवलेली नाही. जनावरांच्या चाऱ्याचीही सध्यातरी काहीही समस्या नाही. त्यामुळे येथील साखर कारखान्यांना गाळपासाठी चांगला ऊस उपलब्ध होऊ शकतो. मात्र राज्यात अन्यत्र आतापासूनच ऊस वाळू लागला आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी वैरणीसाठी उभ्या उसाची विक्री करू लागले आहेत. जर शासनाने चार छावण्या सुरु करण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर राज्यातील साखर कारखान्यांना उसाची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू शकते.

आकडे काय सांगतात..?

महाराष्ट्रात 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन 137 लाख टन झाले होते. ते यंदा 105 लाख टनांवर आले. कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 58 लाख टनांवरून 55.3 लाख टनापर्यंत घसरले. 2023-24 हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटकच्या ऊस पट्ट्यातही पावसाअभावी उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने 15 ऑगस्ट 2023 ला महाराष्ट्रात 15 टक्के ऊस उत्पादन घटण्याचा तसेच 103 लाख टन साखर साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ‘विस्मा’ सध्याची स्थिती लक्षात घेऊन नवे अंदाज जाहीर करणार आहे.

‘अॅग्रीमंडी लाइव’ ने राज्यातील पावसाची सद्यस्थिती, पिकाची वाढ आणि भविष्यातील परिस्थिती आदीचा आढावा घेऊन महाराष्ट्राच्या ऊस उत्पादनात 14 टक्के घट होऊन आगामी हंगामात साखर उत्पादन 90 लाख टन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

ऊस उत्पादन २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता : बी. बी. ठोंबरे

याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले कि, राज्यात पावसाअभावी परिस्थिती फार गंभीर बनत चालली आहे. जूनपासून अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची वाढ खुंटली आहे आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. जर यापुढेही पाऊस पडला नाही तर राज्यातील ऊस उत्पादन तब्बल २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारने तातडीने चारा छावण्या सुरु केल्यास जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर काही प्रमाणात थांबू शकेल. त्याचबरोबर साखर हंगामही १५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान सुरु करावाच लागेल. कारण साखर हंगाम सुरु करण्यास उशीर केल्यास आणखी जास्त ऊस चाऱ्यासाठी वापरला जाऊ शकतो, त्याचा थेट फटका साखर कारखान्यांच्या गाळपाला बसू शकतो. साखर कारखान्याचे गाळप पूर्ण कार्यक्षमतेने न झाल्यास साखर आणि इथेनॉल उत्पादन घटू शकते. शिवाय कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होऊ शकतो.

साखर उत्पादन १२ लाख टन कमी होण्याची शक्यता : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले कि, राज्याची प्रतिदिन ऊस गाळप क्षमता ८ लाख ८२ हजार ५५० टन एवढी आहे. त्यानुसार गेल्या हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून २०५२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. मात्र चालू वर्षी ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. आतापर्यंत २४ लाख ३७ हजार हेक्टर ऊस लागवड करण्यात आली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने साखर उतारा घटणार आहे. त्यामुळे यंदा सुमारे १२ लाख टनाने साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

योग्य नियोजन करून साखर हंगाम पार पाडावा लागणार : अभिजित पाटील

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले कि, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.लोकांना आतापासूनच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुपालकांना  जनावरांना चारा देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.  चारा छावण्या सुरु केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना योग्य नियोजन करून साखर हंगाम पार पाडावा लागणार आहे.

सीमाभागातील कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होण्याची शक्यता : प्रा. एम.टी.शेलार

वरिष्ठ पत्रकार आणि ऊस विषयाचे गाढे अभ्यासक प्रा. एम.टी.शेलार म्हणाले कि, राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात ऊस पिकाची स्थिती अद्याप चांगली आहे. जिल्ह्यात सिंचनाची योग्य व्यवस्था असल्याने नदीच्या पाण्यावरील पिकला अद्याप दुष्काळाची झळ बसलेली नाही. करवीर तालुक्यासह कागल, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, आजरा, चंदगड,भुदरगड आणि गडहिंग्लजमध्ये साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस उपलब्ध होणार आहे. असे असले तरी कर्नाटक सीमाभागातील तसेच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून कोल्हापुरातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः १४० ते १६० लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी जिल्ह्यामध्ये १ लाख ८८ हजार ४५९ हेक्टर ऊस नोंद आहे. गेल्या हंगामापेक्षा लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी उसाच्या दर हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील हातकणंगले, शिरोळ या उसाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या तालुक्यात पाऊसच झालेला नाही. तसेच कागलचा पूर्व भागही पावसापासून वंचित आहे. या भागात उसाच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here