सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे पाण्याअभावी माळरानावरील ऊस पीक वळून निघाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी ऊस वैरणीसाठी तोडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाची लागवडही केलेली नाही.
प्रति गुंठा साडेतीन हजार रुपये दराने उसाची विक्री…
दुष्काळ आणि उसाचा चाऱ्यासाठी वापर वाढल्याने यंदा साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्याची शक्यता धूसर झाली आहे. अनेक कारखान्यांना ऊस टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वैरण नसल्यामुळे अनेक पशुपालक सतराशे ते दोन हजार रुपये प्रति गुंठा दराने वैरण विकत आणत आहेत. अनेक ऊस उत्पादक शेतकरी उसाला पाणी नसल्यामुळे ऊस शेतात वाळून जाण्याऐवजी पशुपालकांना प्रति गुंठा साडेतीन हजार रुपये दराने उभा ऊस विकू लागला आहे.
चारा छावण्या सुरू करण्याची मागणी…
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी व चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. जनावरांना कसे सांभाळायचे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शासनाने वस्त्यांवर टँकरद्वारे जनावरांसाठी पाणी व ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
साखर कारखान्यांसमोर आव्हान…
शेतकरी शेतातील उभा ऊस विकू लागल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होऊ लागले आहे. त्यातच दुष्काळामुळेही यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोबतच उसावर लोकरी मावा आणि हुमनीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दुसरीकडे अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. अशा स्थितीत कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळवताना अक्षरशः संघर्ष करावा लागणार आहे. त्यातून उसाची पळवापळवी वाढणार आहे.