मुंबई : राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा केवळ ३४.१० टक्के इतका कमी झाला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी याच दिवशी ४२.०९ टक्के पाणीसाठा होता. राज्य सरकारने विविध गावे आणि वाड्यांमध्ये टँकरने सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याबाबतचा अहवालही जाहीर केला. त्यानुसार शुक्रवारपर्यंत एक हजार ६६५ गावे आणि तीन हजार ९९९ वस्त्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची गरज सुमारे २८ पटींनी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
राज्यातील २२ जिल्ह्यांतील १ हजार ६६५ गावे आणि ३ हजार ९९९ वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी २ हजार ९३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये खासगी टँकरची संख्या दोन हजार चार, तर सरकारी टँकरची संख्या ८९ आहे असे दिसून येते. धरणांमधील पाणीसाठ्याचा विचार करता, राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये जसे मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य प्रकल्पांमध्ये शुक्रवारपर्यंत ३४.१० टक्के पाणीसाठा होता. एकूण पाणीसाठा १३८०६.२४ दशलक्ष घनमीटर असल्याची माहिती आहे. अहवालानुसार नागपूरमध्ये ४५.१६ टक्के, अमरावतीत ४२.४८ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये १८.३१ टक्के, नाशिकमध्ये ३५.२५ टक्के, पुण्यात ३१.६७ टक्के आणि कोकणात ४१.०७ टक्के पाणीसाठा आहे.