पुणे : साखर निर्यातबंदीचा साखर उद्योगासह ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोचले असताना शेतकऱ्यांना काहीच फायदा झालेला नाही. सरकारने देशात साखरेचे भाव कमी राहावे यासाठी साखर निर्यातीवर बंदी घातली. शिवाय इथेनॉल निर्मितीवरही बंधने आणली. त्यामुळे अनेक वर्षानंतर साखर उद्योगासह ऊस उत्पादकांना मिळालेली सुवर्णसंधी हिरावून घेतली गेली. या स्थितीचा फायदा ब्राझील आणि थायलंडने घेतला. ब्राझीलने इथेनॉलचे उत्पादन कमी केले आणि साखरेचे विक्रमी उत्पादन केले.
जागतिक बाजारात मागणी असताना भारतातून निर्यात झाली असती तर ऊस उत्पादकांना ४००० ते ४५०० रुपये टनांपर्यंतही भाव मिळाला असता. पण सरकारने निर्यातबंदी करून आणि इथेनॉल निर्मितीवर बंधने घालून देशात साखरेचे आणि उसाचे भाव दबावातच ठेवले. भारताने साखर निर्यातबंदी केली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या भावात तेजी आली. निर्यातीस परवानगी दिली असती तर कारखान्यांना उसाला टनाला ४००० पेक्षा अधिक दर देता आला असता. मात्र स्थानिक बाजारात दर नियंत्रणात राहावेत यासाठी निर्यातीवर बंधने घालण्यात आली. त्यामुळे स्थानिक बाजारात साखरेचे घाऊक दर ३८,००० रुपयांपेक्षा कमी राहीले.