कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांतील सततच्या पावसाने शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे नियोजन पुढे ढकलावे लागले. याचा परिणाम रोपांच्या मागणीवर झाला. त्यामुळे सध्या मागणी बघूनच रोपवाटिका चालकांकडून रोपे तयार करण्यात येत आहेत. ऑगस्ट पूर्वार्धापर्यंतच्या मोठ्या मागणीनंतर आता ऊस रोपांच्या मागणीत घट झाली आहे. राज्यात ऑगस्टच्या मध्यापर्यंत दक्षिण महाराष्ट्र वगळता इतरत्र रोपांना मागणी होती.
दक्षिण महाराष्ट्रात पुराच्या शक्यतेने आडसाली लागवडी लांबणीवर टाकण्यात आल्या. पण, राज्यात पुन्हा पावसाने जोर पकडला. ऊस पट्ट्यांमध्ये दररोज एक ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतात वाफसा आलाच नाही. पाणी साचून राहिल्याने ऊस लागवड अशक्य बनल्याने आडसाली लागवडी होणार नसल्याचे चित्र आहे.
‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,यंदा पावसाअभावी मे अखेरपर्यंत ऊस रोपांना मागणी नव्हती. पण नंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून जुलै अखेरपर्यंत मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अनेक रोपवाटिकांमधील रोपे पहिल्या पंधरवड्यात संपली. शेतकऱ्यांना रोपांसाठी धावपळ करावी लागली. मागणीनुसार पुरवठा करणे शक्य नसल्याने रोपवाटिका चालकांनी बियाण्यांसाठी उसाची खरेदी ४००० रुपये टनांपर्यंत केली. मात्र, आता मागणी घटली आहे.
याबाबत जांभळी (ता. शिरोळ) येथील रोपवाटिका चालक प्रल्हाद पवार म्हणाले की, सध्या मागणी कमी असली तरी सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून रोपांना चांगली मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. या दृष्टीशने आम्ही नियोजन करीत आहोत. तर उदगावचे रोपवाटिका चालक स्वप्नील समडोळे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला यामुळे विहिरी कूपनलिकांनाही चांगले पाणी आले आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसेल. रोपांची रखडलेली मागणी पुन्हा वाढू शकते.