कोल्हापूर : गेल्यावर्षी साखर कारखान्यांनी चांगला नफा कमावला होता. साखर व उपपदार्थातून मिळालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणे सहज शक्य होते; मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्यासाठीच कारखानदारांनी वज्रमूठ केली. एक रुपयाही देता येणार नाही, असे म्हणणाऱ्या साखर कारखानदारांनी अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे गुडघे टेकले, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दर आंदोलनाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल आयोजित ‘संघर्ष सन्मान योद्धा’ सभेत ते बोलत होते. या सभेत मानपत्र देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या आंदोलनात ज्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या कार्यकर्त्यांचा नांदणी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या घामाच्या दामासाठी लढाई करत होता. मात्र साखर कारखानदारांनी एकी करून आंदोलन मोडून काढण्याचा चंग बांधला. आता सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनीसुद्धा तशीच पद्धत अवलंबली आहे. त्यांनासुद्धा गुडघे टेकायला भाग पाडू. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही सांगलीतील कारखान्यांना ऊस पुरवठा न करू नये असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले. तानाजी वठारे यांनी प्रास्ताविक केले. सावकर मादनाईक, सागर शंभूशेटे, धीरज शिंदे यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष शेलैश आडके, राम शिंदे, सुवर्णा अपराज, प्रकाश परीट, राजगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.