सिद्धार्थनगर : भारताने तांदूळ निर्यातीवर घातलेल्या बंदीचा परिणाम नेपाळच्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे. नेपाळमध्ये तांदळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. सरकार या स्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतातून तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी चर्चा सुरू आहे असे नेपाळच्या उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाचे म्हणणे आहे. मंत्रालयाचे सहसचिव रामचंद्र तिवारी यांनी सांगितले की, भारताने लागू केलेली निर्यातबंदी दीर्घकालीन असणार नाही. बंदी हटवण्यासाठी भारत सरकारशी सातत्याने चर्चा सुरू आहे. नेपाळमध्ये तांदळाचा तुटवडा नसल्याने व्यापाऱ्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त साठवणूक करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
नेपाळच्या धान्य आणि किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र श्रेष्ठ म्हणाले की, भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर किमती वाढल्या आहेत. सरकारकडे सध्या ९३ हजार क्विंटल तांदळाचा साठा आहे.
तर फूड, मॅनेजमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेडच्या माहिती अधिकारी शर्मिला सुवेदी न्यूपाने यांच्या मते, तांदळाचा पुरवठा खंडित झाल्यास हा साठा वितरणासाठी ठेवला जाईल. हा साठा केवळ तत्काळ परिस्थितीला कव्हर करू शकतो, त्यामुळे भारताने निर्यातीवर दीर्घकाळ बंदी घालू नये आणि इतर पर्यायांचा विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.