नवी दिल्ली : देशात कमी झालेला पाऊस आणि तांदूळ, डाळींच्या कमी पेरणीमुळे किमती वधारल्या आहेत. १४ जुलै रोजी खरीप हंगामाच्या गेल्यावर्षीच्या तलनेत १.६ टक्के कमी होती. याबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तांदूळ आणि डाळींची पेरणी कमी होणे ये यामागील मुख्य कारण आहे. भाताचे लागवड क्षेत्र ६.१ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्याखालील क्षेत्र १३.३ टक्के कमी आहे. तेलबिया, ताग, कापूस यांचे उत्पादनही कमी आहे. दुसरीकडे, भरड तृणधान्ये आणि ऊस लागवड चांगली झाली आहे.
झी बिझनेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये मान्सूनची कमतरता आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगढ, बिहार आणि आसाममध्ये १५ ते ४९ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम भात पेरणीवर झाला. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणासारखे उच्च सिंचन करणाऱ्या राज्यांना कमी फटका बसेल.
प्रमुख कडधान्य उत्पादक राज्यांमध्ये मान्सूनची कमतरता आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये कडधान्य पेरणीवर विपरीत परिणाम होत आहे. डाळींचे उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यांत सिंचनाची कमतरता असल्याने डाळींच्या उत्पादनावर परिणाम होईल. गेल्या पाच महिन्यात डाळींची महागाई जवळपास दुप्पट झाली आहे. जूनमध्ये ही महागाई ६.६ टक्के होती. सद्यस्थितीत उत्तर-पश्चिम प्रदेश आणि मध्य भारत वगळता इतर सर्व प्रदेशांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दक्षिणेकडील द्वीपकल्पात पाऊस सामान्यपेक्षा २२ टक्क्यांनी कमी आहे. परिणामी उत्पादन घटणार आहे.