नवी दिल्ली : चीनच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसल्याने भाताच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यातून आयात आणखी वाढेल असे सांगितले जाते.
भारताने गैर बासमती कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केल्याने जागतिक बाजारात पुरवठा तथा उपलब्धतेची स्थिती बिकट झाली आहे. दरात वाढ होत आहे. जर चीनमधील तांदळाची मागणी वाली तर दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवरील वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठा भात- तांदूळ उत्पादक देश असूनही चीनला परदेशातून नेहमीच मोठ्या प्रमाणावर तांदूळ आयात करावा लागतो. चीनमधील २३ टक्के तांदूळ उत्पादन होणाऱ्या तीन प्रांतांमध्ये पुन्हा एकदा तीव्र पुराचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मंगोलिया, जिलिन हिलोंग जियांग यांचा समावेश आहे. अलिकडच्या आठवड्यात चीनच्या अनेक प्रांतांमध्ये पुराचा तीव्र उद्रेक दिसून आला आहे.
चीनधील चक्रीवादळामुळे भात पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात पिकाचे एकूण किती नुकसान झाले याचा नेमका तपशील सध्या समोर आलेला नसला तरी त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत सरासरी उत्पादन घसरणार अशी शक्यता आहे. चीनमध्ये याआधीच डोकसुरी चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीपर्यंत तांदूळ आयातीत गतीने वाढ होण्याची शक्यता चीनमध्ये वर्तवली जात आहे. त्यातून थालयंड, व्हिएतनामसारख्या देशांना तांदूळ दर आणि निर्यात यात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे.