कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. कारण या महामार्गामुळे ऊसासह अन्य पिकाखालील हजारो हेक्टर शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोल्हापूरसह सांगली आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतून ‘प्रस्तावित’ असलेल्या शक्तिपीठ महामार्गामुळे या भागातील ५ हजार एकर शेती धोक्यात येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६० गावे, सांगली जिल्ह्यातील १९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० गावांना याचा फटका बसणार आहे. कॉंग्रेससह विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवला आहे.
यापूर्वी शासनाचे रस्ते, महामार्ग, प्राधिकरण यांसह विविध कारणांसाठी शेतकरी व ग्रामस्थांची जागा हस्तांतर केल्यास त्यांना शासन चौपट भरपाई देत होते. मात्र आता होणाऱ्या जमीन हस्तांतरात शेतकऱ्यांना फक्त दुप्पट भरपाई देण्याचे शासनाचे आदेश आहेत. बागायती जमीन जाणार असल्याने या महामार्गाला विरोध वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यातील साठ गावांतून हा महामार्ग पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. यातील बहुतांश तालुके बागायती आहेत.
सांगली जिल्ह्यात आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज या तालुक्यांना याचा फटका बसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांना याचा फटका बसणार आहे. या महामार्गाची गरज नसताना जिल्ह्यावर लादला जात असल्याची भावना आहे. तर सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्याला हादरा बसणार आहे. या महामार्गाचा शेतकऱ्यांना नव्हे तर कंत्राटदारांना फायदा आहे अशी टीका केली जात आहे.