कोल्हापूर : ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे यंदा गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीही ऊस तोडणी करू लागले आहेत. यंदा पूर्वानुमानापेक्षा साखरचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी होणार असल्याचा ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचा (ऐस्टा) अंदाज आहे.
मागील वर्षी देशभरात ३२९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. अल निनोच्या स्थितीमुळे देशातील २५ राज्यांत कमी पावसाची प्रतिकूल स्थिती आहे. यामुळे उसाचे पीक घेणाऱ्या राज्यांत यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. ऐस्टाच्या अहवालातही गतवर्षीपेक्षा ४ टक्के कमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. उत्तर प्रदेशात ११७ लाख टन साखरचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे राज्य देशात साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ४७ लाख टन साखर उत्पादन करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या हंगामात महाराष्ट्रात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा आतापर्यंत ९६ लाख टनांवर उत्पादन झाले आहे.