भारतीय रेल्वेच्या चिक्कोडी रोड रेल्वे स्टेशनवरून भरल्या जाणाऱ्या रेल्वे रेकमध्ये साखरेचे २४ इंडेंट कॅन्सल करण्याचा प्रकार घडला आहे. रेल्वे स्टेशनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मध्यरात्री फोन करून साखर व्यापाऱ्यांना पॅनल डॅमरेजमुळे सकाळी लवकरात लवकर, सहा वाजता साखर भरावी, अन्यथा इंडेंट कॅन्सल करावे असे सांगितले. इतक्या कमी वेळात साखर भरणे शक्य नसल्याने साखर व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव रेक कॅन्सल करावे लागले. नियोजन नसल्याने या प्रकारात भारतीय रेल्वेचेही किमान सोळा कोटी रुपयांचे नुकसान झाले. याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी, असे मत महाराष्ट्रातील ट्रेडर व डी स्वयंम शुगर हाऊसचे प्रमुख राजकुमार देसाई यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत, राजकुमार देसाई यांनी सांगितले की, मी गेली दहा – बारा वर्षे साखर खरेदी-विक्री व्यवसायामध्ये आहे. आमच्या डी स्वयंम शुगर हाऊस फर्ममधून कोलकाता, गुवाहटी आदी ठिकाणी रेल्वे रेकच्या माध्यमातूनही साखर खरेदी विक्री केली जाते. मात्र, २१ डिसेंबर २०२२ रोजी चिक्कोडी रोड रेल्वे स्टेशनवरुन साखर भरली जाणार होती. काल या रेल्वे स्टेशनवरुन गुवाहाटी, पूर्णिया (बिहार), रंगापाणी तसेच राणीपत्रा अशा वेगवेगळ्या ठिकाणी किमान २४ इंडेंट लागले होते. रात्री दहा वाजता रेल्वे स्टेशनवरील सीजीएसनी सर्व साखर व्यापाऱ्यांना फोन करुन संबंधीत रेल्वे स्टेशनला पॅनल डॅमरेज असल्यामुळे इंडेंट सप्लाय सकाळी लवकर करा असे सांगण्यास सुरुवात केली. आपल्यालाही मध्यरात्री दीड वाजता फोन करून तुमचें इंडेंट सकाळी सहा वाजता प्लेस होणार आहे. त्यावेळी तुम्ही साखर भरणार आहात की इंडेन कॅन्सल करायचे अशी विचारणा केली. मात्र, इतक्या कमी वेळात साखर भरणे शक्य नसल्याने रेक कॅन्सल करावी लागली, असे देसाई यांनी सांगितले.
रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली. अत्यंत नियमबद्ध, साचेबद्धपणे केल्या जाणाऱ्या या व्यवहारामुळे भारतीय रेल्वेने काल सोळा कोटी रुपयांचा व्यवसाय गमावला आहे. रेल्वेतील मालाची चढ-उतार करणारे हमाल, आसपासचे साखर पाठवू इच्छिणारे दहा ते बारा साखर कारखान्यांचेही नुकसान झाले. साखर उचल न झाल्यामुळे दरात १० ते २० रुपयांची कपात करावी लागली. असे प्रकार घडू लागले तर व्यापारी साखर पाठवण्यासाठी खासगी वाहतूक अथवा खासगी रेल्वेची सोय अशा पर्यायांचा विचार करू शकतात. अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने सुधारणेची भूमिका घ्यावी. जबाबदार उच्चपदस्थ अधिकारी, एफवाय सिस्टीममध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि साखर पाठविणारे बडे व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची गरज असल्याचे राजकुमार देसाई यांनी सांगितले.
राजकुमार देसाई यांनी सांगितले की, यापूर्वी कोल्हापूरमध्ये रेल्वे खात्यातर्फे माल वाहतुकीत वाढ होण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. दिल्लीच्या स्तरावर अडचणी सोडविण्यासह फुल्ल ऐवजी हाफ रेकची सुविधा देण्यापर्यंतचे आश्वासन दिले. त्यातून व्यवसाय वाढला आहे. आज यातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. रेल्वे खात्याने भारतीय अर्थव्यवस्थेप्रमाणे आधुनिकतेची कास धरून किमान २४ ते ४८ तास आधी, व्यापाऱ्यांशी ई-मेल, व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधून अशा प्रकारांची पूर्वकल्पना द्यावी. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना एकाचवेळी रेल्वे रेक कॅन्सल करण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.