सातारा : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धांदल सुरू आहे. त्यामध्ये बहुतांश साखर कारखानदार गुंतले आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा जोर चढला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. जिल्ह्यात या वर्षी सुमारे ८५ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. हा ऊस वेळेत जाण्यासाठी कारखान्यांना नियोजन करावे लागणार आहे. विधानसभेचा प्रचार सुरू असल्याने हंगाम सुरू करण्याकडे फारसे लक्ष नसल्याने निवडणुकीच्या निकालानंतर हंगाम सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे एक महिना हंगाम पुढे जाणार आहे. ऊस हंगामाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण १७ साखर कारखाने आहेत. बहुतांश साखर कारखान्यांनी गत हंगामात शेतकऱ्यांना एफआरपीच्या रकमा दिल्या आहेत. या हंगामात साखर कारखान्यांची संख्याही वाढली असून खासगी, सहकारी मिळून १८ कारखाने गाळप करणार आहेत. हंगामासाठी गाळप परवाने मिळविण्यासाठी कारखान्यांचे प्रस्ताव गेले आहेत. बहुतांशी कारखाने हे लोकप्रतिनिधींचे असून, हे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरले आहेत. निवडणुकीच्या धांदलीत हंगामाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.