हि बातमी तुम्ही आता ऐकू ही शकता
बिजनौर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
उत्तर प्रदेशात थकीत ऊस बिलाचा विषय खूपच गंभीर होत आहे. बिजनौर येथे थकीत उसाच्या बिलासाठी आझाद किसान युनियनने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जानेवारी अखेर जर, उसाची बिले दिले नाहीत तर, युनियनने ४ फेब्रुवारीला सामूहिक आत्मदहनाचा इशारा युनियनकडून देण्यात आला आहे.
बिजनौर जिल्हा साखरेचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात नऊ साखर कारखाने असून, त्यातून ६५० कोटी रुपयांची ऊस बिल थकबाकी आहे. जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात बिजनौर आणि चांदपूर साखर कारखान्याची गेल्या हंगामाचीही ६० कोटी रुपयांची थकबाकी आहे.
उसाची बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांत त्याची तीव्रता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना टाळे ठोकून मागण्यांकडे लक्ष वेधले होते. आता युनियनचे नेते राजेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
सिंह म्हणाले, ‘आत्मदहनाशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही. शेतकऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरणे अशक्य झाले आहे. मुलांची लग्ने थांबली आहेत. भाजपने शेतकऱ्यांची देणी भागवण्याचे आश्वासन दिले होते. पण, सत्तेत आल्यानंतर त्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरही कर्जे आहेत. त्या ओझ्याखाली शेतकरी दबला जात आहे. बँकांनी शेतकऱ्यांना नोटिस पाठवायला सुरुवात केली आहे. उसाचे बिलच हातात पडत नसल्यामुळे शेतकरी बँकांचे पैसे भागवण्यास असमर्थ आहेत.’
त्यामुळे जर जानेवारी अखेर आमची बिले मिळाली नाहीत. तर ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडांची चिता उभी करून आम्ही सामूहिक आत्मदहन करू, असा इशार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या संदर्भात जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, ‘आम्ही सर्व साखर कारखान्यांना उसाचे पैसे वेळेत देण्याच्या सूचना केल्या आहेत. बिल थकवलेल्या तीन कारखान्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.’
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp