सोलापूर : जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे उसाचे फड पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ऊस तोडणी यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे. आणखी ८ ते १५ दिवसांपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. त्याचा फटका साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच पावसाअभावी दुष्काळजन्य स्थितीने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना या नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.
सोलापुरात नोव्हेंबरमध्ये १३ सहकारी आणि २६ खासगी अशा ३९ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड आहे. दुष्काळामुळे ऊस उत्पादन ३० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत घटल्यामुळे साखर कारखानदारांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे कारखानदारांमध्ये ऊसदर देण्याची स्पर्धा सुरू आहे.
अवकाळी पावसाने उसाच्या फडामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने चिखल झाला आहे. काही ठिकाणी तळ्याचे रूप आल्याने ऊसतोडणी यंत्रणा ठप्प झाली आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा आदी भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. पंढरपुरातील पुळूज, कासेगाव, पटवर्धन कुरोली आदी भागात पावसाने ऊसतोड यंत्रणा थांबली आहे.