जालना : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सुरुवातीपासून उसाच्या लागवडी धीम्या राहिल्या आहेत. सध्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही ऊस लागवडीला वेग आला नसल्याचे चित्र वडीगोद्री परिसरात दिसून येत आहे. साखर कारखान्यांना पाण्याअभावी लागवडी घटल्यास पुढील वर्षी उसाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. याचबरोबर साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा पाऊस कमी असल्याने शेवटच्या दोन महिन्यांत उसाला पाणी मिळाले नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीपासूनच पाणी पातळी घटल्याने अनेकांनी ऊस लागवड केली नसल्याने पुढील हंगामात ऊस लागवडीसह उसाचे उत्पादनही घटणार आहे. २५ टक्के ऊस लागवड कमी होणार असल्याचे कारखान्यातील सूत्रांनी सांगितले. दुष्काळी वातावरणामुळे जिल्ह्यात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यंदा परिसरातील तलावांसह धरणांमध्येही मोजकाच पाणीसाठा आहे. विहिरी व कूपनलिकांचे पाण्याच्या पातळीतही घटल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पाणी पुरेल की, नाही याबाबत उत्पादकामध्ये साशंकता आहे.