कोल्हापूर : थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बील जमा करण्याचा दत्त-दालमिया शुगरचा निर्णय विकास सेवा संस्थांना अडचणीचा ठरत आहे. याप्रश्नी करवीर तालुक्यातील अनेक विकास संस्थांनी कॉंग्रेस नेते, आमदार सतेज पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व दत्त-दालमिया प्रशासनास दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ऊस पिकवताना उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज स्वरुपात पैसे, विविध शासकीय योजनांचा लाभ, खते, पाणी पुरवठा आदी सेवा विकास सेवा संस्था देतात. मोबदल्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास सेवा संस्था आपली रक्कम वसुली करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देत असतात. पण कारखान्यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केल्यास विकास संस्था वसुली अभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर निगवे दुमाला, शिये, भुये, भुयेवाडी, केर्ली, केर्ले, वरणगे, वडणगे, कुशिरे, पोहाळे आदी गावातील विकास सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यासंदर्भात निवेदन देण्याचा निर्णय घेतला. निगवे दुमालाच्या जय हिंद विकास संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाश पाटील यांनी परिसरातील सर्व गावातील संस्थांमध्ये जनजागृती केली.
प्रारंभी दत्त – दालमिया कारखाना प्रशासनाने निवेदन स्विकारण्यास असमर्थता दर्शविली, पण शिष्टमंडळाने अकाऊंट विभागाला निवेदन देत पुर्वी प्रमाणे सात दिवसांत ही रक्कम जिल्हा बँक आणि विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली. तसे न झाल्यास कारखाना बंद पाडू, असा इशारा शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी प्रकाश पाटील, बाळासाहेब शिरोळकर, जयसिंग काशीद, शिवाजी कुशीरकर, मारुती उत्तरेकर आदी उपस्थित होते.