नाशिक : कारखान्याने यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती द्वारकाधीश साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली. शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या २४ व्या गाळप हंगामाच्या बॉयलर पूजनप्रसंगी सावंत बोलत होते. उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, संचालक कैलास सावंत यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिरात पूजन करून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, शोभा भालेराव, मुख्य शेतकी अधिकारी विजय पगार, वैशाली पगार, एस. ई. साळुंखे, ए. आर. सोनवणे, भूषण नांद्रे, बापू सूर्यवंशी, प्रभाकर रणदिवे त्यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले.
सावंत म्हणाले की, कारखान्याचा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी द्वारकाधीश परिवारातील सदस्य आहे. त्यामुळे आजपर्यंत कोणताही कर्मचारी, मजूर व शेतकऱ्यांचा रुपया बाकी नाही. दिवाळीच्या आत परंपरेप्रमाणे सर्वांना बोनस दिला जाईल. कर्मचारी, प्रशासन यांची एकत्र मोट बांधली तरच सर्वांच्या एकीच्या बळातून विकासाची संधी मिळते. यावेळी विजय वाघ यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करून उसाची लागवड व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी कैलास वाघ, बाळासाहेब करपे, नाना रौंदळ, सतीश सोनवणे, कारभारी बोरसे, दीपक आहेर, संजय अहिरराव, महिंद्र अहिरराव, साहेबराव पगार, गोपी शेलार, संजय देवरे,दीपक पवार, प्रकाश चव्हाण, विलास खैरनार आदी उपस्थित होते.