कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २७ फेब्रुवारीअखेर ५ लाख ६ हजार ९२० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत ५ लाख ५५ हजार १०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा डिस्टीलरी व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून चालू गळीत हंगामात ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार पाटील म्हणाले की, कारखान्याच्यावतीने १६ जानेवारी ते ३१ जानेवारीअखेरच्या या ६ व्या पंधरवड्याचे २२ कोटी १० लाखांचे ऊसबिल ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने १६ ते ३१ जानेवारी या पंधरवड्यात गाळप केलेल्या ६९ हजार ८६ मे. टन उसाचे ३२०० रुपयांप्रमाणे होणारे बिल आदा केले आहे. अद्याप गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण व्हायचे असल्याने सभासद, बिगर सभासदांनी ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.