नवी दिल्ली:मे महिन्यात पेट्रोलमसोबत इथेनॉल मिश्रण पहिल्यांदाच 15 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. जैव इंधन उत्पादकांनी खरेदी वाढवल्याने हा टप्पा गाठला गेला आहे.पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल(PPAC) च्या मासिक रेडी रेकनर अहवालानुसार, मे 2024 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 15.4 टक्के होते आणि नोव्हेंबर 2023-मे 2024 यादरम्यान एकत्रित इथेनॉल मिश्रण 12.6 टक्के होते.एक जून 2024 पर्यंत एकूण 81,698 पीएसयू रिटेल आउटलेट्सपैकी 14,611 पीएसयू आउटलेट्स E20 इथेनॉल मिश्रित मोटर स्पिरिट(MS) वितरित करत आहेत.
पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल (PPAC), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) संलग्न असून त्यांच्यावतीने तेल आणि वायू क्षेत्रावरील डेटा संकलित केला जातो आणि त्याचे विश्लेषण करून क्षेत्रनिहाय अनेक अहवाल प्रसारित केले जातात.सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी एजन्सी तसेच खाजगी कंपन्यांकडून हा डेटा मिळवला जातो.उर्जेची सतत वाढत जाणारी मागणी आणि अक्षय आणि जैवइंधनाकडे होणारे संक्रमण पाहता, धोरण निर्माते आणि विश्लेषकांना तेल आणि गॅस उद्योगाला अद्ययावत ट्रेंडची माहिती असणे आवश्यक आहे.
अलीकडे, PPAC ने अहवाल दिला की भारत 2025 पर्यंत 20 टक्के मिश्रण साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि 30 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 81,529 पीएसयू रिटेल आउटलेटपैकी 13,569 पीएसयू आउटलेटवर E20 पेट्रोल उपलब्ध होते. देशात E27 चा यशस्वी पायलट अभ्यास झाला आहे. 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित डिझेल इंधनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंदाजे 1016 कोटी लिटर इथेनॉल आवश्यक आहे. इतर वापरासह एकूण 1350 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. यासाठी, 2025 पर्यंत सुमारे 1700 कोटी लिटर इथेनॉल-उत्पादन क्षमता आवश्यक आहे. कारण प्लांट्स 80 टक्के कार्यक्षमतेने चालतात. सरकारने दुचाकी आणि प्रवासी वाहन प्रकारातील पेट्रोल-आधारित वाहनांची वाढ आणि मोटर स्पिरिट(MS) ची अनुमानित विक्री लक्षात घेऊन 2025 पर्यंत इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणासाठी आवश्यक असलेल्या मागणीचा अंदाज लावला आहे.