नवी दिल्ली : देशातील ई २० इंधनाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता पाहता केंद्र सरकार पुढील वर्षासाठी इथेनॉलचा कॅरी ओव्हर स्टॉक करण्याची योजना तयार करीत आहे. इंधन वितरण कंपन्यांनी (ओएमसी) देशातील ३१ शहरांमध्ये जवळपास १०० आऊटलेट्समध्ये में E२० इंधन वितरण सुरू केले आहे. अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुबोध कुमार यांच्या म्हणण्यानुसार, साखरेप्रमाणेच सरकार डिसेंबर २०२३- नोव्हेबंर २४ या इथेनॉल वर्षामध्ये ओएमसी आणि डिस्टिलरीजसोबत इथेनॉलचा कॅरी ओव्हर स्टॉक उभारणीची योजना तयार करीत आहे. आणि यासाठी अधिकाधिक साखरेचा वापर केला जाईल.
ते म्हणाले की, सरकारने चालू २०२२-२३ या इथेनॉल वर्षामध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर पुढील वर्षासाठी १५ टक्क्यांची लक्ष्य आहे. देशात फेब्रुवारी अखेरपर्यंत १२० कोटी लिटर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले आहे. इथेनॉलची उपलब्धता आणि उत्पादन क्षमता या वर्षीची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी पुरेशी आहे. चालू वर्षात जवळपास ५ मिलियन टन साखरेचे इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्ट केले जाण्याचे अनुमान आहे. २०२१-२२ या वर्षातील ३.६ मिलियन टनापेक्षा ते अधिक असेल.
पुढील वर्षी १५ टक्के मिश्रण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १५० कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. आणि सरकार साखर कारखाने आणि डिस्टिलरींना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे. या वर्षी फेब्रुवारीपर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता १०४० कोटी लिटर करण्यात आली आहे. सरकारने २४३ योजनांना मंजुरी दिली आहे आणि बँकांनी २०,३३४ कोटी रुपयांचे कर्ज मंजुर केले आहे. आणि यापासून ११,०९३ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सरकारने आगामी योजनांचा आढावा घेतला आणि पुढील ९-१० महिन्यांत जवळपास २५०-३०० कोटी लिटर इथेनॉल क्षमता येईल असे स्पष्ट केले.