कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील एकुरका (ता. केज) येथील राजाभाऊ नारायण धस आणि मनिषा धस या ऊस तोडणी मजूर दांपत्याने १२५ दिवसांत ३ लाख ९० हजार रुपये मजुरी मिळवली. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याकडे केलेल्या ऊस तोडणीतून त्यांनी ही जबरदस्त कमाई केली आहे. त्याची शिरोळ तालुक्यात चर्चा सुरू आहे. दररोज बैलगाडीतून ऊस वाहतूक करताना ३६० ते ४०० मोळ्या घेऊन त्यांनी ही कमाई केली आहे.
राजाभाऊ आणि मनीषा धस यांनी दररोज पहाटे सवा पाचच्या दरम्यान बैलगाडीतून ऊस तोडणीचे ठिकाण गाठायचे. पहाटे सहापासून ऊस तोडणी करायचे. सोन्या आणि गुण्या या बैलांच्या साह्याने ते ऊस वाहतूक करायचे. दिवसातून दोन बैलगाड्या म्हणजे जवळपास ९ टन ऊस ते शिरोळच्या दत्त कारखान्यात पोहोचवायचे. या जोडीने १२५ दिवसांत ६६१ टन ऊस तोडला आहे. त्यामुळे श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी धस दांपत्याचा सत्कार केला. कारखाना कार्यस्थळावर त्यांचा सत्कार करण्यात आला.