तैपेई : तैवानच्या पूर्व किनारपट्टीला बुधवारी सकाळी ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपानंतर तैवानच्या किनारी भागात आणि काही शेजारील देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपात चार लोकांचा मृत्यू झाला आणि किमान 57 जखमी झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपामुळे पूर्व किनाऱ्यावरील हुआलियनच्या प्रमुख इमारतींचे नुकसान झाले आहे. हे ठिकाण भूकंपाचे केंद्र होते. या परिसरात बचावकार्य सुरू आहे.
असोसिएटेड प्रेसच्या मते, 7.2 तीव्रतेचा भूकंप हुआलियन शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर आणि सुमारे 35 किलोमीटर खोलीवर झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता 7.4 नोंदवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोंगराळ मध्य पूर्व किनारपट्टीवर भूस्खलनासह 25 हून अधिक आफ्टरशॉक जाणवले. तैवानच्या राष्ट्रीय अग्निशमन संस्थेच्या म्हणण्यानुसार, सकाळी 8 वाजताच्या भूकंपानंतर हुआलियन काउंटीमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आणि किमान 57 जखमी झाले.
या भूकंपात 26 इमारती कोसळल्या. 20 हून अधिक लोक त्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा हेल्मेट देऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तैवानमध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आली. भूकंपामुळे मेट्रो लाइनच्या रेल्वे मार्गाचे नुकसान झाले आहे. तैवानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. मात्र, हा 25 वर्षांतील सर्वात मोठा भूकंप असल्याचे बोलले जात आहे. तैवान ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’च्या पट्ट्यात येतो. पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा ज्वालामुखी आणि भूकंपांचा पट्टा आहे. हा पट्टा पॅसिफिक महासागराला वेढला आहे, जिथे जगात सर्वाधिक भूकंप होतात. 1901 ते 2000 दरम्यान तैवानमध्ये 91 मोठे भूकंप झाले.