नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी, कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध आदी प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात शाह यांची भेट घेऊन ते साखर कारखानदारांची समस्या मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय, या भेटीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांविषयीही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इथेनॉल बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका हा साखर कारखादारांना बसणार आहे. त्यासंदर्भात भेट घेवून पवार हे शहा यांच्याशी चर्चा करतील. माजी मंत्री राजेश टोपे हेदेखील अमित शहांच्या भेटीसाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दुसरीकडे राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. दरम्यान, इथेनॉल उत्पादन बंदीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे ८ टक्क्यांनी घसरले आहेत. देशांतर्गत बाजारातही या निर्णयाचा परिणाम दिसून येईल, असे मानले जात आहे.