लखनौ : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लखनौ विभागीय कार्यालयाने अखेर उत्तर प्रदेशातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांच्या फसव्या निर्गुंतवणुकीसंदर्भात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ च्या तरतुदींनुसार ९९५.७५ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये तीन बंद साखर कारखाने आहेत. त्यात मोकळी जमीन, इमारती आणि यंत्रसामग्री आहे.
माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांच्या नियंत्रणाखालील मेसर्स मेलो इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स डायनॅमिक शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स हनीवेल शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचा यात समावेश आहे. हे सर्व साखर कारखाने उत्तर प्रदेशातील बैतालपूर, भटनी आणि शाहगंज येथे आहेत. सीबीआयने आयपीसी, १८६० आणि कंपनी कायदा, १९५६ च्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. याबाबत दाखल, एफआयआरमध्ये आरोप आहे की मोहम्मद इक्बाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखाने बनावट निर्गुंतवणूक प्रक्रियेद्वारे फसवणूक करून विकत घेतले. ईडीच्या चौकशीत निर्गुंतवणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता उघडकीस आल्या. त्यामध्ये मालमत्तेचे कमी मूल्यांकन आणि गैर-स्पर्धात्मक बोली प्रक्रिया समाविष्ट आहे.