नवी दिल्ली : केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनेला खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने असोसिएशनला सांगितले आहे की, खाद्य तेलाच्या किमती तत्काळ प्रभावाने १५ रुपयांनी कमी कराव्यात. उत्पादक आणि वितरकांनी या किमती कमी करण्यास वितरकांना तातडीने सांगावे. तरच किमती कमी झाल्याचा परिणाम सर्वत्र दिसून येईल. जेव्हा उत्पादक, रिफायनरींकडून दर कमी केले जातात, तेव्हा उद्योगाने दर कमी केले पाहिजेत असे सरकारने सांगितले आहे. काही कंपन्यांनी दर अद्याप कमी केलेला नाही आणि त्यांची एमआरपी अधिक आहे, अशांनी तत्काळ दर कमी करावेत अशी सूचना करण्यात आली.
याबाबत इंडिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, ६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत अशी चर्चा झाली की, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात केल्या जाणाऱ्या खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. खाद्य तेलाबाबत ही खूप सकारात्मक बाब आहे. त्यामुळे देशांतर्गत खाद्य तेल उद्योगानेही आपल्या बाजारपेठेतील किमती समान केल्या पाहिजेत. वेळ न दवडता या किमती कमी करुन ग्राहकांना लाभ दिला पाहिजे. बैठकीत खाद्य ते पॅकेजिंगसह इतर मुद्यांवर चर्चा झाली. भारताला आपल्या गरजेच्या ६० टक्के खाद्य तेल आयात करावे लागते. जागतिक दबावामुळे गेल्या काही काळापासून तेलाच्या किमती खूप वाढल्या होत्या. आता या दरात सुधारणा झाली आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी दरात १०-१५ रुपयांची कपात केली होती. यापूर्वीही दर कपातीचा परिणाम दिसून आला होता. गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. आता जागतिक पातळीवर तेल दरात कपात झाल्याने सरकारने बुधवारी सर्व खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना पुढील आठवड्यात तेल दरात १० रुपये प्रती लिटर कपात करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने खाद्यतेलाच्या कंपन्यांना देशभरात समान दर ठेवण्याचा आदेश दिला आहे.