नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये क्रूड आणि रिफाइंड पाम तेलाच्या शिपमेंटमध्ये घट झाल्यामुळे भारताची खाद्यतेल आयात वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत १६ टक्क्यांनी घटून १३.०७ लाख टन झाली. औद्योगिक संघटना सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये खाद्यतेलाची आयात घटून १३,०७,६८६ टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १५,५५,७८० टन होती.
‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, खाद्यतेल विभागात, कच्च्या पाम तेलाची आयात ८,४३,८७९ टनांवरून ६,२०,०२० टनांवर घसरली, तर रिफाईंड पामोलिनची आवक २,५६,३९८ टनांवरून २,५१,६६७ टनांवर कमी झाली. तथापि, समीक्षाधीन कालावधीत कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात १,९४,००९ टनांवरून वाढून २,६०,८५० टन झाली आहे. गैर खाद्य तेलाची आयात डिसेंबर २०२२ मध्ये १०,३४९ टन होती. गेल्या महिन्यात, डिसेंबर २०२३ मध्ये ही आयात ४,००० टनांवर घसरली.
SEA ने सांगितले की, डिसेंबर २०२३ मध्ये वनस्पती तेलांची (खाद्य तेले आणि अखाद्य तेले) आयात १६ टक्क्यांनी घसरून १३,११,६८६ टन झाली आहे, जी एका वर्षापूर्वी १५,६६,१२९ टन होती. तेल विपणन वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या दोन महिन्यांत वनस्पती तेलाची एकूण आयात २१ टक्क्यांनी घसरून २४,७२,२७६ टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ३१,११,६६९ टन होती.