मुंबई : देशातील खाद्यतेल उत्पादनात ३० टक्के तुट येण्याची शक्यता आहे. तेलबिया पिकांच्या लागवडीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मात्र पावसाच्या अनियमितपणामुळे प्रत्यक्ष उत्पादन घटले आहे. गेल्या दहा दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशात महागाई आणखी भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश असलेल्या भारतात मागणीच्या ४० ते ४५ टक्केच खाद्यतेल तयार होते. उर्वरित आयात खाद्यतेलात ६५ टक्के पामतेलाचा समावेश असतो. देशात निर्माण होणाऱ्या ४५ टक्के खाद्यतेलात २५ टक्के सोयाबीन, राइसब्रान, भुईमुगचा समावेश असतो. मात्र, यंदा सोयाबीन पेरणीत ०.९६ टक्के वाढ दिसून आली. गेल्या वर्षीपेक्षा १.१८ लाख हेक्टरवर सोयाबीनच्या पेरण्या जादा झाल्या. मात्र, उत्पादन घटले आहे.
देशात खरीप हंगामात भुईमुग, एरंडी, तीळ, जवस, सोयाबीन व सूर्यफूल यांचे या सहा प्रकारच्या तेलबियांचेच उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी २६१.५० लाख टन उत्पादन झाले होते. यंदा २८३.७० लाख टनाचे उद्दिष्ट असताना फक्त २१५.३३ लाख टन उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. मलेशियाने पामतेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्याचा फटका आयातीला बसला असून दर वाढ झाली आहे असे अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले. पामतेलाचा घाऊक दर १५ दिवसांत ८२ रुपयांवरून ८५ रुपयांवर गेला आहे. सोयाबीन तेलाचे दर ९१ रुपयांवरून ९७ रुपये, मोहरी तेलाचे दर १०५ रुपयांवरून १०८ रुपये, शेंगदाणा तेल १५४ रुपयांवरून १५८ रुपयांवर पोहोचले आहेत.