पुणे : पुणे विभागात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या तीन लाख २ हजार ७७९ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली, पूर्वहंगामी व खोडवा ऊस लागवडी ठप्प आहेत. साखर कारखान्यांचा पुढील गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. फक्त पाणी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे.
पुणे विभागात सरासरीच्या तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टरपैकी तीन लाख २ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत. जवळपास ४० हजार ६१३ हेक्टरने ऊस लागवडी घटल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळ या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत. दरवर्षी शेतकरी १५ जानेवारी १५ फेब्रुवारी या काळात सुरू उसाच्या लागवडी शेतकरी करतात. परंतु याच काळात पाणीटंचाई सुरू झाल्याने सुरू उसाच्या अवघ्या १८ हजार ६२६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. आतापर्यंत जवळपास एक लाख २४ हजार ३१२ हेक्टर खोडवा ऊस शेतकऱ्यांनी ठेवला आहे.