अहिल्यानगर : डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने पांडुरंग लॉन्स येथे काल मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताराचंद गाडे होते. यावेळी कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू राहिला पाहिजे त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न केले जातील. या कारखान्याची सत्ता उपभोग करणारे मात्र या प्रकरणात निशब्द भूमिका वठवत आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. कारखाना सूरु झाला पाहिजे ही बचाव समितीची भूमिका आहे. आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी अजित कदम म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवळाली प्रवरा हे आजोळ आहे . कारखाना चालविण्याच्या संदर्भात त्यांची भेट घेतलेली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू म्हणाले की, सहकारात ज्यांनी डॉक्टरेट मिळवली त्यांना गणेश, राहुरी हे दोन्ही कारखाने चालवता आलेले नाहीत. कामगार नेते भरत पेरणे म्हणाले की, कामगारांनी तीन वर्षे निम्म्या पगारावर काम केले. मात्र ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी केसाने गळा कापला. यावेळी बाबाकाका देशमुख, विनायक भुसारी, वसंतराव गाडे, आप्पासाहेब दूस, सुभाष डौले, गंगाधर तमनर, संजय पोटे, बाळासाहेब पेरणे, भगवान देशमुख, बाळासाहेब उंडे यांची भाषणे झाली. विजय कातोरे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. पंढरीनाथ पवार, अॅड. रावसाहेब करपे, नारायण जाधव, सुधाकर कराळे, श्रीराम गाडे, अर्जुन दुशिंग उपस्थित होते.