नवी दिल्ली : आगामी काळात, २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेवर भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. चालू वर्षी तेल कंपन्या आणि साखर कारखान्यांदरम्यान ३१८ कोटी लिटर इथेनॉलचे करार करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील तेल रिफायनरींसह घाऊक वितरक देशव्यापी स्तरावर ७.६३ टक्के इथेनॉल मिश्रण करणार आहेत. तर देशातील ११ राज्ये १० टक्के मिश्रण करण्यात यशस्वी झाली आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, यंदा डिसेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी गेल्या आठवड्यापर्यंत ३१८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार करण्यात आले आहेत. मात्र, पेट्रोलच्या खपात घसरण झाल्याने यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. तेल उत्पादक कंपन्या आम्हाला इतर विभागांत इथेनॉल पाठविण्यास सांगत आहेत. मात्र, ही राज्ये दूरवरची आहेत. इथेनॉल उत्पादकांना विशेष वाहतूक दराशिवाय तेथे इथेनॉल पोहोचविणे नुकसानीचे ठरणार आहे.
पेट्रोलियम उत्पादनांचा खप घसरल्याने इथेनॉलच्या मागणीत घट झाल्याचे तेल उत्पादक कंपन्यांनीही मान्य केले आहे. तेल उत्पादक कंपन्या पेट्रोलियम उत्पादनांच्या एकूण विक्रीच्या आधारावर इथेनॉल खरेदी करतात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपन्या इथेनॉल साठवणुकीसाठी डेपो तयार करीत आहेत. वर्मा यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादकांना तेल कंपन्यांकडून मिळणारे वाहतूक शुल्क खूप कमी आहे. त्यांनी आम्हाला वाहतूक खर्च द्यावा अथवा आमच्या कारखान्यांतून इथेनॉल न्यावे असे आम्ही त्यांना सांगितले आहे. रेल्वेद्वारे ही वाहतूक करणे सोयीचे ठरू शकते असेही तेल कंपन्यांना सुचविण्यात आले आहे.