कोल्हापूर : येथील अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पुन्हा चालवायला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत संचालक मंडळाची बैठक शनिवारी (दि. १८) दुपारी ३ वाजता होणार आहे. या बैठकीत कारखाना व अर्कशाळा सहयोगी तत्त्वावर, भाडेतत्त्वाने, भागीदारीत की बीओटी तत्त्वावर चालवायला द्यायचा याविषयी निर्णय होईल. सध्या कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह काही संचालकांनी केलेल्या मागणीनुसार, कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण केले जात आहे.
विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कारखान्याची सत्ता आहे. गेल्यावर्षी संचालक मंडळाने वर्षभर बंद कारखाना आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासह स्वबळावर चालविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मंत्री मु्श्रीफ यांच्या प्रयत्नांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून तब्बल ५५ कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले. परंतु कारखाना वेळेत सुरू न झाल्याने गाळपाची उद्दिष्टपूर्ती झाली नाही. त्यामुळे कारखाना आणखी आर्थिक आरिष्टात आहे. यापूर्वी संचालकांनी नियोजित इथेनॉल प्रकल्पासह गाळप क्षमता वाढविण्यासाठी अन्य वित्तीय संस्थाकडून अर्थसाहाय्य मिळविण्याचा निर्णय एकमताने झाला. मात्र फारसे काही झालेले नाही. गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष संचालकांच्या नव्या बैठकीकडे लागले आहे.