कर्नाल : ICAR- ऊस उत्पादन संस्थेच्या संशोधकांनी हरियाणा, पंजाब, युपी, राजस्थान आणि बिहारसारख्या उत्तर-पश्चिमेकडील राज्यांमधील क्षारयुक्त जमिनींसाठी उसाचे क्षार सहनशील वाण विकसित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. संशोधन संस्थेमध्ये एक मायक्रो चेंबर स्थापन करून तेथे उसाच्या विविध प्रजातींची क्षारासोबत विविध आर्द्रतेमध्ये चाचणी घेतली जात आहे. विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या या विशेष संशोधन कक्षामध्ये नैसर्गिक क्षारता आणि क्षारतायुक्त वातावरण विकसित केले जाईल, जेणेकरून शास्त्रज्ञांना या प्रदेशासाठी योग्य, वैविध्यपूर्ण वाण मिळू शकेल. आतापर्यंत केंद्राने उत्तर – पश्चिम विभागातील जवळपास २० ऊसाच्या प्रजातींची निवड केली आहे. गेल्या अनेक दशकांपासून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या वाणांचा यात समावेश आहे.
विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. एस. के. पांडे यांनी सांगितले की, विकसित प्रजाती आधीपासूनच शेतकरी आणि साखर उद्योगाला चांगले साखर उत्पादन आणि उसाच्या उत्पादनात मदत करीत आहे. मात्र, क्षारता हे शेतकऱ्यांसमोरील आव्हान आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रकारची प्रजाती विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, ज्याची क्षमता क्षारयुक्त वातावरण सहन करण्याची असेल. हरियाणा, पंजाब, युपी, बिहार आणि राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे पिक योग्य पद्धतीने टिकू शकत नाही. आम्ही क्षार सहनशीलता विकसित करण्यासाठी उसाच्या विविध क्लोनवर काम करू.