कोईम्बतूर : कृषी पदवीधरांसाठी शेती, संशोधन, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात भरपूर संधी आहेत, असे प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा यांनी केले. शनिवारी तामिळनाडू कृषी विद्यापीठात (टीएनएयू) आयोजित ४३ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. आहुजा म्हणाले की, भारत दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायासह मोठ्या प्रमाणात कृषी वस्तूंचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. परंतु इतर विकसित देशांच्या उलट स्थिती आपल्याकडे आहे. आपल्याकडे ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ते म्हणाले की, पदवीधरांनी कृषी उद्योगातील आव्हाने समजून घेतली पाहिजेत. ते कृषी क्षेत्रात त्यांचे ज्ञान कशा प्रकारे वापरू शकतात, याचा विचार केला पाहिजे. इंधनाची गरज भागवण्यासाठी इथेनॉलचा वापर १२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. ऊस, मका आणि इतर स्रोतांपासून इथेनॉल मिळते. या विशिष्ट क्षेत्रात उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचा पर्यायदेखील शेतकऱ्यांना आहे.
आहुजा म्हणाले, एमएस स्वामिनाथन यांच्याप्रमाणे पदवीधरांनी येत्या दोन दशकात कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. या परिवर्तनातून पाणी टंचाई, मातीचे आरोग्य टिकवणे इत्यादी समस्या सोडवल्या पाहिजेत. शेतीच्या गरजा भागवल्या पाहिजेत.
मनोज आहुजा म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता त्यात पाच पटीने वाढ झाली आहे. कृषी विभागासाठी १.२५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावरून कृषी क्षेत्राचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचे कल्याण लक्षात येते. आहुजा म्हणाले की, पीएम-किसान सन्मान निधी अंतर्गत आजपर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे ३ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ३०,००० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. तर दावा सेटलमेंट सुमारे १,५०,००० कोटी रुपये आहे.
ई-मार्केटिंगमुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना विकण्यास आणि चांगला नफा मिळविण्यास मदत होत असल्याचेही ते म्हणाले. समारंभात एकूण ३,७२० पदवीधरांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी १,५८९ पदवीधरांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली. टीएनएयूचे कुलगुरू व्ही. गीतलक्ष्मी, कुलसचिव आर. थामिझ वेंडन आणि इतर उपस्थित होते.