सातारा : जावळी तालुक्यातील कृषी उद्योग क्षेत्राला चालना देणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्यावर्षी सव्वातीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून प्रतापगडचा गळीत हंगाम यशस्वी केला आहे. यावर्षीचा हंगाम यशस्वीपणे पार पाडणे आव्हानात्मक आहे. उसाचे क्षेत्र कमी असल्याने बाहेरील कारखाने येथील ऊस नेण्याचा प्रयत्न करतील; परंतु ज्यावेळी त्यांच्या क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढेल, त्यावेळी ते इकडे फिरकणार नाहीत. त्यामुळे आपल्या हक्काचा प्रतापगड कारखाना सुरू राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले म्हणाले की, भविष्यात कारखाना स्वबळावर चालावा व स्वयंपूर्ण व्हावा, त्यादृष्टीने ‘अजिंक्यतारा’चे व्यवस्थापन कार्यरत आहे. कार्यक्रमावेळी माजी अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, जितेंद्र शिंदे, जयदीप शिंदे, एकनाथ ओंबळे, हणमंत पाटें, तानाजी शिर्के, मच्छिंद्र मुळीक आदी उपस्थित होते. संचालक राजेंद्र फरांदे-पाटील यांनी आभार मानले.