सांगली : महांकाली साखर कारखान्याची सत्ता अडचणीच्या काळातच माझ्याकडे आली. कारखाना मी दोन वर्षे सक्षमपणे चालवला.आता कारखाना शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू करायचा आहे. येत्या चार-पाच महिन्यांत तो पुन्हा सुरू केला जाईल.तालुक्याला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल. त्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन महांकाली कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे यांनी केले.
नांगोळे रोड येथील स्व. विजयराव सगरे फार्म हाऊसवर सगरे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत त्या बोलत होत्या.अनिता सगरे म्हणाल्या की, कारखान्याचे कर्ज भरण्यासाठी जमीन विक्रीच्या अडचणी होत्या. त्या जवळपास संपुष्टात आल्या आहेत. कारखान्याच्या शासकीय देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. टी. व्ही. पाटील यांनी सांगितले की, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून कारखाना सुरू करण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यायला हवा. उपाध्यक्ष दीपकराव ओलेकर, चंद्रकांत लोंढे, हायुम सावनुरकर, मोहन खोत, साधना कांबळे, नानासाहेब वाघमारे आदींची भाषणे झाली. दीपकराव ओलेकर यांनी स्वागत केले. प्रा. राजाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. युवा नेते शंतनु सगरे यांनी आभार मानले.