सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे इथेनॉल उत्पादन तिपटीहून अधिक करण्यात येत आहे. याशिवाय कारखान्याची गाळप क्षमता १२०० टीसीडीने वाढवण्यात येत असून आगामी सात महिन्यांत ही दोन्ही कामे पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित करू, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन आणि एमडी डॉ. राहुलदादा कदम यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामाचा आणि गाळप हंगामाचा प्रारंभ नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार वनश्री मोहनराव कदम, आ. अनिल बाबर, आ. विश्वजित कदम, कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
डॉ. राहुल कदम म्हणाले, कारखान्याची इथेनॉल उत्पादन क्षमता प्रती दिन ५५ हजार लिटरवरून १ लाख ७५ हजार लिटर केली जाईल. गाळप क्षमता ४,००० टीसीडीवरून ५,२०० टीसीडी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ही दोन्ही कामे सात महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कदम म्हणाले की, उदगिरी शुगरने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रथमच देशात आणले. गेल्यावर्षी प्रदूषण कमी करण्यासाठी आरपीसी प्रणाली बसवली. हे तंत्रज्ञान वापरणारा उदगिरी शुगर हा देशातील पहिला साखर कारखाना आहे. कारखान्याचा इव्हॉपरेशन प्लँट फाइव्ह स्टेज असून, त्याची रोजची क्षमता ४०० मे. क्यूब, १.५ केजी प्रेशर आहे. हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. डिस्टिलेशन डिपार्टमेंटमुळे वीज निर्मिती क्षमता वाढते. १.५ केजी प्रेशरने चालणारा कारखान्याचा हा प्रकल्प राज्यातील पहिला आणि देशातील पाचवा आहे.कोजन बॅक प्रेशर केल्यामुळे दररोज सहा लाख लिटर पाण्याची बचत केली जाते. कारखान्याने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले वेळेवर अदा केली आहेत.