कोल्हापूर / बेळगाव : सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सीमेवरील गावांतील ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कारखानदारांनी यंदा मध्यप्रदेश, बिहार येथून ऊसतोडणी मजूर आणले आहेत. हे उसाची पळवापळवी करीत आहेत. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सीमेलगतच्या साखर कारखान्यांची नोंदणी बहुराज्य असल्याने ते महाराष्ट्र, कर्नाटकातील ऊस गाळप करतात. जिल्ह्यातील कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार फडात आहेत.
दरम्यान, आज, 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील गाळप हंगामही सुरु झाल्याने राज्यातील साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे विधानसभा निवडणूक आणि दुसरीकडे गाळप हंगाम अशी निवडणुकीत उभारलेल्या साखर कारखानदारांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागणार आहे. सद्यस्थितीत बेळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र सीमेजवळील संकेश्वर, निपाणी, बेडकीहाळ, चिक्कोडी, शिवशक्ती, अरिहंत-चिक्कोडी, उगार शुगर्स, अथणी शुगर्स, कृष्णा-अथणी हे साखर कारखाने नऊ नोव्हेंबरला सुरू झाले आहेत. या कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची ऊसतोड सुरू आहे. त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे.