कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड गुरुवारी (दि. २८) होणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष वसंतराव धुरे, मुकुंदराव देसाई व विष्णुपंत केसरकर यांची नावे चर्चेत आहे. तर उपाध्यक्षपदासाठी एम. के. देसाई यांचे नाव निश्चित मानले जाते. गवसे (ता. आजरा) येथील कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात निवड प्रक्रिया होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे हे असतील.
आजरा कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने सत्ता मिळवली. आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होईल. निवड सभेच्या आदल्या दिवशी बुधवारी याबाबत बैठक होणार आहे. त्यावेळी संचालकांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर मुलाखतीतून निवड होईल. सध्या धुरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.