सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्याची क्रांती उद्योग समूहाची परंपरा यापुढेही कायम ठेवू, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष शरद लाड यांनी दिली.
कुंडल येथील गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कूल, माध्यमिक विद्यालय, क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.
लाड म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे, अधीक्षक एस.डी.लाड, गोविंद डुबल, प्राचार्य डॉ. आर.एस.डुबल, अरुण सावंत, बी.डी.होनमाने, शिवाजी लाड आदी उपस्थित होते.
सभासदाच्या वारसांना मदतीचा हात…
क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड साखर कारखान्याच्या मयत सभासदाची पत्नी सुजाता दत्तात्रय कचरे यांना एक लाख रुपये मदतीचा धनादेश कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, आ. अरुण लाड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. आ. लाड म्हणाले, कारखान्याचे सभासद दत्तात्रय कचरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सभासद म्हणजे कारखान्याचा कणा आहे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी आम्ही सभासदांचा विमा उतरविला आहे. यातून त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर भविष्यातही काही अडचण आल्यास आम्ही एक कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहतो. यावेळी कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.