न्यूयार्क : देशामध्ये जैव इंधनाची वाढती मागणी आणि भडकलेल्या किमती लक्षात घेऊन ब्राझीलमध्ये साखर आणि इथेनॉल उद्योगाने साखर उत्पादनात कपात करून इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. डाटाग्रो कन्सल्टन्सीने ही माहिती दिली आहे.
याबाबत विश्लेषक प्लिनियो नास्तारी यांनी सँटेंडर आयएसओ डेटाग्रो न्यूयॉर्क शुगर आणि इथेनॉल परिषदेत सांगितले की, इथेनॉलच्या विक्रीवर मिळणारा आर्थिक परतावा साखर विक्रीतून मिळणाऱ्या आर्थिक परताव्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे काही कारखान्यांनी आपल्या उत्पादनाच्या धोरणात बदल केला आहे.
साखर उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ब्राझीलने आपल्या ऊस उत्पादनाचा एक मोठा भाग इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्याने साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने ब्राझीलशी व्यवहार करणाऱ्या अनेक बाजारपेठांनी आता आपल्या साखरेची गरज भागविण्यासाठी भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे.