पुणे : भविष्यात साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजनसारख्या पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत मार्गदर्शन करताना मंत्री गडकरी बोलत होते. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते परिषदेचे औपचारिक उद्घाटन झाले. जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी असा परिषदेचा विषय आहे. परिषदेला २७ देशांमधील दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ‘चीनीमंडी’ या परिषदेची मिडिया पार्टनर होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपण सुमारे ८० टक्के पारंपरिक इंधन आयात करतो. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील साखर उद्योगाला भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे परवडणारे नाही. उद्योगाने इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर भर देण्याची गरज आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जैविक इंधन म्हणून ओळखले जाते. कारखान्यांनी हायड्रोजन निर्मितीच्यादृष्टीने अधिक प्रयत्न करावेत. हायड्रोजन सारख्या हरित इंधनाला प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र अभियान हाती घेतले आहे. साखर उद्योगानेदेखील त्याचा फायदा घ्यावा.