नैरोबी : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या तुलनेत जादा उत्पादन खर्चामुळे साखर उद्योगासमोर मोठे आव्हान उभे आहे. स्थानिक स्तरावर उत्पादन झालेल्या साखरेची किंमत अधिक असल्याने केनियाला साखर आयात करणे अपरिहार्य बनते. त्यामुळे केनिया आता साखर आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत साखर उत्पादनाला प्रोत्साहन देईल अशी माहिती औद्योगिकीकरण, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाचे मुख्य प्रशासन सचिव लॉरेन्स करंजा यांनी दिली. केनिया असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्सतर्फे साखर उप क्षेत्र धोरणात्मक योजनेच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. ऑनलाइन बैठकीत करंजा यांनी केनिया आयात घटविणार असल्याचे संकेत दिले.
कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी सुमारे ६,६०,००० टन साखरेचे उत्पादन होते. मात्र, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी इतर आफ्रिकी देशांकडून ३,००,००० लाख टन साखरेची आयात केली जाते. याबाबत केनिया असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्समध्ये साखर उप क्षेत्राचे अध्यक्ष जॉयस ओपोंडो म्हणाले, कृषी क्षेत्रात रोख पैसे मिळवून देणाऱ्या पिकाचे अधिक महत्त्व आहे. कारण ऊस हे ४,००,००० हून अधिक छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पान्नाचा मुख्य स्त्रोत आहे. पूर्व आफ्रिकी देशात सद्यस्थितीत टेबल आणि रिफाइंड साखर या दोन्ही घटकांची कमतरता आहे. मात्र, पूर्व आणि दक्षिण आफ्रिकी (कोमेसा) बाजारांकडून शुल्क मुक्त पद्धतीने त्याची आयात करून गरजांची पूर्तता करणे शक्य असल्याची माहिती ओपोंडो यांनी दिली.