नवी दिल्ली : यंदाचे २०२२ साठी संसदेत सादर झालेले बजेट हे कृषी बजेट आहे असे मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. या बजेटमुळे कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सरकारने चौफेर विकासासाठी बजेटमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. हे बजेट अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे असे तोमर यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, कृषी उत्पादनामध्ये आपम जगात पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आज देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. सरकारने आता सेंद्रीय शेतीचे उद्दीष्ट ठेवले आहे. डाळींचे उत्पादन देशाच्या गरजेनुसार झालेले नाही. सरकारने ऑईल पाम मिशन राबवले आहे. त्यातून तेलाचे दर कमी होतील. सरकारने तेलातील भेसळ बंद केली आहे. यापूर्वी आपण अन्नासाठी आयातीवर अवलंबून असायचो. मात्र, आता देशात अन्नधान्याची टंचाई नाही. सरकार धान्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. पाला जाळणे शेतकऱ्यांना सोयीचे असले तरी ते पर्यावरणासाठी हानीकारक असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.