सातारा : गेल्या वर्षीच्या उसाला ४०० रुपयांचा अंतिम हप्ता आणि यंदा ३,५०० रुपये प्रती टन दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट निर्माण झालेले आहे. बहुतांशी कारखानदारांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तर काहींनी तीन हजारांच्या आत दर जाहीर केला आहे. यामुळे ‘स्वाभिमानी’ने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात सध्या एक लाख हेक्टरवर ऊस क्षेत्र गेले आहे. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून १५ हून अधिक साखर कारखाने आहेत. सद्यस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि गनिमी कावा सुरू असल्याने ऊस वाहतुकीलाही अडचण निर्माण झालेली आहे. संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारखानदार मागील तुटलेल्या उसाला किती रुपये देणार आणि यंदा काय दर जाहीर करणार यावरही आंदोलनाची दिशा ठरणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले की, बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर न करता गाळप सुरू केले आहे. हे बेकायदा आहे. यावर्षी टनाला साडे तीन हजार रुपये दराचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही.