पुणे: साखर उद्योग तंत्रज्ञानातील राज्यातील सर्वात जुनी असलेल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) च्या ६५ व्या वार्षिक संमेलनाची सांगता बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी झाली. या दोन दिवसीय वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते, ऊस व साखर उद्योगांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या विविध शेतकरी आणि उद्योजकांना गौरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी कृषि विषयक, इंजिनीरिंग आणि प्रोसेस, को- प्रॉडक्ट्स आणि व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांकडून सत्रे व त्यावरती चर्चा झाली.
यावेळी साखर निर्मिती क्षेत्रात शून्यातून सुरुवात करून प्रभावशाली योगदान देणारे दौंड येथील नाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत, कोल्हापूर येथील जवाहर एस.एस.के.चे कल्लाप्पा आवाडे, उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल निरानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे समुह कार्यकारी संचालक संगमेश निरानी, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सुधाकर ठिगळे आणि श्रीकृष्ण देव, उत्पादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अजितसिंग पाटील, अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विजय खोत, कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मच्छिंद्र बोखरे, सहउत्पादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मोहन डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. तर संजीव माने, अशोक खोत, प्रद्युमन अतोदरिया आणि अशोक पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुंडुराव मेमोरियल लेक्चर अंतर्गत कोईमतूर शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूटचे डॉ. बक्षीराम यांचे ”दुष्काळरोधीत आणि उच्च उत्पादकता तसेच उच्च साखर उतारा देणाऱ्या उसाच्या जाती” या विषयावर व्याख्यान झाले. तर जे.पी. मुखर्जी मेमोरियल लेक्चर अंतर्गत राष्ट्रीय शर्करा संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन यांचे “साखरे पलीकडचा भारतातील साखर उद्योग ” या विषयावर व्याख्यान झाले.
या वार्षिक संमेलनाच्या सांगता समारंभ वेळी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) च्या अध्यक्षपदी श्री. श्रीपाद गंगावाती यांची एकमताने निवड करण्यात आली. तांत्रिक उपाध्यक्षपदी श्री. विक्रम शिंदे यांची तर कर्नाटक भागातून सोहंन शिरगाववकर व महाराष्ट्रा भागातून श्री. एस. बी. भड यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. मावळते अध्यक्ष श्री. मानसिंगराव जाधव यांनी नव्या निवडीवरती शिक्कामोर्बत केले. या वेळी डीएसटीए कौंसिल मेंबर श्री. एस. के. मरवाडकर,माजी अध्यक्ष श्री. मानसिंगराव जाधव, श्री. श्रीकृष्ण देव, श्री. मुकुंद कुलकर्णी, श्री. अजित चौगुले, श्री. बी. डी. पवार, श्री. एस. एम. पवार, श्री. डी. एम. रासकर उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.