सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या गळित सांगता समारंभ आमदार अरुणअण्णा लाड यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी ऊस वाहतूक कंत्राटदार, तोडणी कंत्राटदार तोडणी मुकादम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील प्रमुख उपस्थित होते.कारखान्याने यंदा १४५ दिवसांत १० लाख ९१ हजार ७०० मे. टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला असून १२.२० टक्के साखर उताऱ्यासह ११ लाख ८० हजार क्विंटल साखर उत्पादन मिळवले आहे.
आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले की, यंदाचा हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. आता पुढील हंगामसुद्धा कमी दिवसात जास्त गाळप करून पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करुया. यंदाचा हंगाम केवळ तीन महिने चालेल, असे म्हटले जाते होते. पण तो पाच महिने चालला. नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने उसाची वाढ चांगली झाल्याने हा हंगाम १४५ दिवस चालला. भविष्यात यंत्राद्वारे ऊस तोडणीकडे कल वाढवावा लागेल. यावेळी कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी स्वागत केले. दिलीप पार्लेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक सुभाष वडेर यांनी आभार मानले. यावेळी जनार्दन पाटील, अंकुश यादव, जी. के. जाधव, सुबराव लाड, संदीप पवार, संचालक जयप्रकाश साळुंखे, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.