छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना – सचिन घायाळ शुगर लि.ने या हंगामात २ लाख २० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तालुक्यातील नोंद घेतलेल्या सर्व उसाचे गाळप पूर्ण झाले असून पुढील गळीत हंगाम हा सर्वांसाठी आव्हान निर्माण करणारा असेल. सर्वांनी जोमाने काम करण्याचे आवाहन चेअरमन सचिन घायाळ यांनी केले.
कारखान्याच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामाची सांगता शनिवारी झाली. गव्हाणीचे विधिवत पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक विक्रम घायाळ यांच्या हस्ते करून हंगामाची सांगता करण्यात आली. व्हाइस चेअरमन प्रल्हाद औटे, संचालक आबासाहेब मोरे, भाऊसाहेब पिसे, एकनाथ नवले, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी यशवंत कदम यांनी आभार मानले.