मुंबई, दि. 1- राज्यात अन्नधान्याची कमतरता नाही तथापि ते पिकविणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. शेती क्षेत्राबरोबरच राज्याच्या विविध भागात ज्या बाबींची आवश्यकता आहे असे उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
‘फिक्की’ च्या शिष्टमंडळाने आज एमएमआरडीए च्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील उद्योगक्षेत्राच्या विकासाविषयी चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उद्योजकांनी राज्याच्या गरजेनुसार उद्योगांचे सर्वंकष ठोस प्रस्ताव सादर केल्यास त्यांना मान्यतेसाठी क्विक रिस्पॉन्स विंडो उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महानगर आयुक्त आर.ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, फिक्कीच्या अध्यक्ष संगीता रेड्डी उपाध्यक्ष उदय शंकर यांच्यासह फिक्कीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील सर्व शहरे विकसित होणेही आवश्यक आहे. शेती आणि मोठ्या उद्योगांबरोबरच प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेनुसार त्या त्या भागात विविध उद्योग सुरू झाल्यास राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. चांगल्या दर्जाच्या शिक्षणामुळे संस्कृती विकसित होते असे नमूद करून रोजगार उपलब्धतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यांवर पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठा वाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यासमोर विविध समस्या आहेत तथापि सकारात्मकतेने काम केल्यास यावर निश्चित मात करता येईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी जगभरातील मुंबईकर उद्योजकांना सोबत घेण्याचा मानस व्यक्त केला. उद्योग प्रत्यक्षात उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी उद्योजकांनी राज्याचे दूत बनून आणि शहरांची ओळख कायम ठेवून विकासात्मक कामांचे प्रस्ताव सादर करावेत, त्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील उद्योजकांमध्ये मोठी क्षमता असून विविध क्षेत्रात शासनासोबत काम करण्यास उद्योजक उत्सुक असल्याचे सांगितले.
विद्युत प्रभारीत दुचाकींचे उदघाटन एमएमआरडीए आणि युलू कंपनीच्या माध्यमातून वांद्रे आणि कुर्ला परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या विद्युत प्रभारीत दुचाकींचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. वांद्रे पूर्व ते कुर्ला पश्चिम परिसरात विविध २० ठिकाणी सुमारे २५० दुचाकी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांना ‘YULU’ मोबाईल अँप च्या माध्यमातून प्री पेड पद्धतीने या दुचाकी वापरता येणार आहेत.